Skip to main content

Posts

Showing posts from December, 2019

गझल : २२. वृत्त : आनंदकंद.

हा एक फक्त दिधला उपहार धोरणाने. बे-भाव कृषक मेला सरकार धोरणाने. जर लोक हे असेची मरणार धोरणाने, होणार काय सांगा उद्धार धोरणाने? गावात आज उरली समशान घाट शांती, आधीच अंत्य केला संस्कार धोरणाने. फुकटात शेत तारण ठेऊन पण जहाले, असल्यास सांग अजुनी दरकार धोरणाणे? अजिबात हीन ठरलो शेतीत राबताना, याहून काय केला सत्कार धोरणाने? लक्षात आज आले म्हणतात कृष कशाला, साक्षात कृश बनवले बीमार धोरणाने. जोडून दे म्हणावे एकेक वीट आता, तडकून पार गेले घरदार धोरणाने. आजार लाइलाजी आहेत धोरणे ही, होणार काय तो या उपचार धोरणाने. कल्याण क्षेम माझे बस हेच खूप झाले, आता न कर अजोणी उपकार धोरणाने. 'रविपाल' कर अशा या धिक्कार धोरणांचा, येतात हेच आता उद्गार धोरणाने. गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर (विश्वस्तरीय लेखनस्पर्धा - २०१८, गझल विभागात प्रथम पुरस्कार प्राप्त गझल. पैठण जि. औरंगाबाद, संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह येथे दि. ०३/०२/२०१८, ला ५ व्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन मंचावर पुरस्कार प्राप्त.)

गझल : २१. वृत्त : मंजुघोषा

ऐक माझी ही विनंती आज देवा. कोण आहे मी मला हे सांग देवा. छंद काही बोलण्याचा सुटत नाही, काय असते सांग ना रे मौन देवा. पाहतो 'रविपाल' आहे सर्वकाही, पण तयाला होत नाही ज्ञान देवा.

गझल : २०. वृत्त : आनंदकन (जू काफ़िया मिसाल)

प्रत्येकदा नसावे चिकटून या मनाला. केंव्हा तरी रहावे सोडून या मनाला. पाहून बुत मलाही का वाटते असे की, गालामधे हसावे चकवून या मनाला? आहे तरी जवळ का लावायला दवाई, घायाळ जर करावे बोलून या मनाला? मी ऐकले परत हे येते कधी तरी मन, ये एकदा म्हणावे परतून या मनाला! 'रविपाल' रे मनाची मैत्री तुला जडाली, जर वाटते रडावे बिलगून या मनाला. गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर

गझल : १९. वृत्त : राधा

रे, विभूती द्वेष जर का करत आहे तू! मुर्ख नाही तर म्हणावे काय आहे तू? जवळ येता स्वच्छ झाले तेच सारे जे, दूर असता म्हणत होता भ्रष्ट आहे तू! अंध नाही पण तरीही अंधतेविन का? मार्गदर्शन आंधळ्यांचे घेत आहे तू! उत्तरांनी सुटत नाही प्रश्न कारण की, प्रश्न नाही कोणताही प्रश्न आहे तू! जिंदगी 'रविपाल' नाही एकट्याची ही, रूप असलो मी तरीही नाव आहे तू! गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर