Skip to main content

Posts

Showing posts from October, 2019

गज़ल : ८. वृत्त : स्त्रग्विणी

गुंग मी जाहलो खेळता खेळता. आठवण विसरलो खेळता खेळता. वाटले जे सुकर ते कठिन जाहले, आणि मी जिकरलो खेळता खेळता. कैकदा मी जरी फारकत घेतली, पण तरी मिसळलो खेळता खेळता. सांजला मायने हाक 'ये' मारली, अन घरी परतलो खेळता खेळता. मारफत या गझल सांगणे हेच की खेळ 'रविपाल' रे खेळता खेळता. गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर

गज़ल ७. वृत्त : विद्युल्लता

कोणी जरी न म्हटले तुजला कधी बरे. करतो स्वतः मुखाने तू आपले खरे. जावे परी हमेशा यावे परत पुन्हा, तेथेच त्या ठिकाणी राहू नये अरे! फोफावले असेही हे गाव की अता, बाहेरही शिवेच्या विस्तारली घरे. विहिरीत या तरीही पाणी न लागले, फुटले जरी श्रमाणे अंगावरी झरे. 'रविपाल' मन गळू दे केंव्हातरी तुझे, देतो तुला शुभेच्छा मंगल हरे हरे! गज़लकार : डॉ. रविपाल भारशंकर

गज़ल ६. वृत्त : स्वानंदसम्राट + शेतकरी (गागालगागा गागालगागा) + (गागागा गागालगागा) ९३ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन २०२० उस्मानाबाद येथे सादरीकरणाकरीता निवड झालेली गझल

बचती अभावी केली हमेशा घाट्याच्या सौद्यात शेती. सांगा कशी सापडणार नाही कर्जाच्या विळख्यात शेती. शेतात माझ्या थोडा तरी या पैशाचा पाऊस पाडा, असतो करत मी वाजिब दराच्या दुष्काळी पट्ट्यात शेती. लावून चारा करतात जैसा न्यौछावर बकरा बळीचा, लुटतात अगदी तैसीच बिल्कुल मदतीच्या बदल्यात शेती. बैलाप्रमाणे जोखंड नसले मानेवर माझ्या तरीपण, आहे करत मी या शासनाच्या कानूनी फास्यात शेती. देशात एके काळात होती शेती ही सर्वात उत्तम, पण आज ठरली दर्जात दुय्यम साऱ्याची याच्यात शेती. 'रविपाल ' आहे कल्याणकारी लोकांचे गणराज्य हे तर, देशोधडीला का लागली ही लोकांच्या राज्यात शेती ? गज़लकार : डॉ. रविपाल भारशंकर (९३ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे कवीकट्टा या मंचावर सादरीकरणाकरीता निवड झालेली गझल. दि. १२ जानेवारी २०२०)

गज़ल ५. वृत्त: बहर ए मजार

गातोस रे सुरेख किती छान आपला. आवाज हा झकास तुला मस्त लाभला. रमनीय वाक तीर असा काय फेकला ? वेधून लक्ष्य नजर बळी चक्क घेतला ! येऊन खुद्द सांग मला काय जाहले, संदर्भ पूर्ण पक्ष मुला मांड आपला. एकाच अमृतास बहू नाव ठेवले, अल्लाह मानला नि कुणी देव मानला. 'रविपाल' जात येत किती लोक भेटले, त्यांनाच राम राम करत जीव आटला. गज़लकार : डॉ. रविपाल भारशंकर

गज़ल ३. वृत आनंदकंद

तू कल्पना अम्हाला देऊन जा कुठेही. आई मला म्हणाली सांगून जा कुठेही. बेटा, अरे उपाशी, जाऊ नको कधीही. काहीतरी सकाळी खाऊन जा कुठेही. हे काय, तू विसरला ही पेन ह्या इथे बघ, शर्टावरी खिशाला लावून जा कुठेही. कर चांगल्या मुलांची संगत सदा तरीपण, सर्वास दे भरवसा धावून जा कुठेही. बोलू नको उगाची 'रविपाल' तू कुणाला, साखर अरे जिभेवर ठेवून जा कुठेही. गज़लकार : डॉ. रविपाल भारशंकर

गज़ल २. वृत्त: विद्युल्लता

असते कशी शहादत पाहून या तुम्ही. सीमेवरी जराशे जाऊन या तुम्ही. नंतर करा जगाला रोशन कधी तरी, घर आपले अगोदर बारून या तुम्ही.  तुमच्या खुळेपणाला फळ लागले खुळे, आतातरी हुशारी पेरून या तुम्ही. भगवा निळा नि हिरवा एकत्र या इथे,  हा आपला तिरंगा फडकून या तुम्ही. खचलेत मृत बळीचे परिजन अशा क्षणी, 'रविपाल' जा तयांना भेटून या तुम्ही. गज़लकार : डॉ. रविपाल भारशंकर

गज़ल १. वृत्त: आनंदकंद.

फळली मला कधीही नाही कृषी मुळावर. मारूनही फवारा पडली अळी फुलावर. कर्जास या अता मी फेडायचे कशावर, लागत तरी निघाली नाही कुण्या पिकावर. जीएम बी बियाणे पेरायला मनाई, शेती कशी करावी या तुगलकी तिरावर. जर रास्त दर मिळाला मालासही कृषीच्या, मरणार मी कशाला लटकूनिया सुळावर. 'रविपाल' कर अता या सरकारची अवज्ञा, धोरण अरे तयाचे उठले तुझ्या जिवावर. 'रविपाल' तू कितीदा ऋण फेडले तरीही, विळखा महाजनांचा पडला तूझ्या घरावर. गज़लकार : डॉ. रविपाल भारशंकर (९२ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन यवतमाळ २०१९, येथे कवीकट्टा या मंचावर सादरीकरणाकरीता निवड झालेली गझल. दि. १३/०१/२०१९.)